चंद्रपूर २७ ऑगस्ट – कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी तीनही कार्यालय क्षेत्रात बनविण्यात आलेल्या २३ कृत्रिम विसर्जन स्थळांना पसंती देत चंद्रपूरकर नागरिकांनी ३१४३ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलाव तसेच फिरत्या विसर्जन कुंडात केले आणि कोव्हीड १९ बाबतच्या स्वयंशिस्तीचा तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश स्वकृतीतून दाखवून दिला.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सींगचे आवाहन करीत महापौर सौ. राखी कंचर्लावार व महापालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी नागरिकांना सोयीचे होईल अशाप्रकारे प्रत्येक भागात कृत्रिम तलाव निर्मितीचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभाग अधिकारी यांनी विभागनिहाय सर्वेक्षण करून २३ जागा निश्चित केल्या होत्या. त्याठिकाणी १२ बाय१६ आकाराचे कृत्रिम तलाव महानगरपालिकेने अत्यंत कमी कालावधीत तयार केले. तसेच शहरातील मूर्ती संकलनासाठी ‘ फिरते विसर्जन कुंड ‘ कार्यरत ठेवण्यात आले आहे.
नागरिकांना या कृत्रिम तलावांच्या ठिकाणांची माहिती व्हावी तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे याकरीता ऑटोद्वारे सर्वांना आवाहन करण्यात आले, सोशल मिडीयावरून त्याचा व्यापक प्रचार करण्यात आला. लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनीही कृत्रिम तलावाची माहिती नागरीकांना पोहचविण्यात पुढाकार घेत कृत्रिम तलावात विसर्जनाचे आवाहन केले. या सर्व प्रयत्नांना चंद्रपूरच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी पाच दिवसांच्या एकूण ३१४३ श्रीगणेशमूर्तींचे विभागांमधील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
यामध्ये – झोन क्र. १ अंतर्गत ८०८, झोन क्र. २ अंतर्गत १४१८, झोन क्र. ३ अंतर्गत ८६० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या ३१४३ गणेश मुर्तींपैकी २७६३ मातीच्या तर ३८० पीओपीच्या आहेत. फिरत्या विसर्जन कुंडात ५७ मातीच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
या सर्व कृत्रिम विसर्जन तलावांच्या ठिकाणी संबंधित विभाग कार्यालयांच्या कर्मचारी वर्गासह स्वयंसेवक व सुरक्षारक्षक तैनात होते. उपायुक्त विशाल वाघ तसेच सर्व सहा. आयुक्त यांचे विसर्जन व्यवस्थेवर लक्ष होते. योग्य नियोजनामुळे सर्व विसर्जनस्थळांवरील विसर्जन सोहळा अत्यंत सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाला. नागरिकांकडूनही घराजवळच उपलब्ध करून देण्यात आलेल्या विसर्जन स्थळ व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सर्व विसर्जनस्थळांवर ओले व सुके निर्माल्य वेगवेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते. यापुढील विसर्जनदिनीही महानगरपालिकेमार्फत अशाच प्रकारची सुयोग्य व्यवस्था या कृत्रिम विसर्जन स्थळांवर असणार आहे.