चंद्रपुर २५ ऑगस्ट – शहरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या बघता कोरोना विषयक नियमावलीचे पालन न करणाऱ्या दुकानदार, प्रतिष्ठाने तसेच मास्क न लावणाऱ्या नागरीकांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असून आतापर्यंत नियम मोडणाऱ्या २४०४ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार तसेच नागरीकांकडून ४,९३,८९०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याऱ्या व अवैध खर्रा विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.
आजही शहरातील अनेक परिसरांमध्ये सोशल डिस्टंसींगच्या नियमांना गांभीर्याने घेतले जात नाहीये. एकमेकांमधे अंतर राखणे तर सोडाच पण साधे तोंडाला मास्क बांधण्याची तसदीही काही बेशिस्त नागरीक घेत नाहीत. अश्या महाभागांमुळे कोरोना अधिक फोफावत आहे, अश्या लोकांवर आता कठोर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.
मनपाकडून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र अश्या परिस्थितीतही काही दुकानदार, प्रतिष्ठाने तसेच नागरीक नियमांचे पालन करत नाहीये. नियमांचे पालन न केल्यानेच ही संख्या वाढत असल्याने अश्या सर्वांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
सहायक आयुक्त शितल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील यांच्या नेतृत्वात तीनही झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे , सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे द्वारे कारवाई करण्यात सातत्याने सुरु आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे, सोशल डिस्टंसींग पाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.