दीड दिवसानंतर ११६४ गणेश मुर्तींचे विसर्जन

चंद्रपूर २४ ऑगस्ट – रविवारी दीड दिवस पूर्ण होताच श्रीगणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलाव व फिरते विसर्जन कुंड येथे कोरोनाबाबतचे नियम पाळत ११६४ गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यात झोन क्र. १ अंतर्गत ३१७, झोन क्र. २ अंतर्गत ५३०, झोन क्र. ३ अंतर्गत ३१७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.  विसर्जित करण्यात आलेल्या ११६४ गणेश मुर्तींपैकी १०९१ मातीच्या तर ७३ पीओपीच्या आहेत. फिरत्या विसर्जन कुंडात २२ मातीच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.  यावर्षी चंद्रपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूरकरांनी कृत्रिम तलावांबरोबरच फिरत्या विसर्जन कुंडालाही पसंती दिली. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने उत्सवाप्रसंगी निर्बंधांचे पालन करावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता श्री गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपातर्फे कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली होती.  या व्यवस्थेमध्ये अधिक भर घालत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मूर्ती संकलनासाठी ‘ फिरते विसर्जन कुंड ‘ कार्यरत ठेवण्यात आले आहे.
मनपातर्फे २३ कृत्रिम तलाव व २०  निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने उत्सव साजरा करताना दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here