चंद्रपूर:२२ ऑगस्ट
राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे आयटीसी या नामवंत कंपनीच्या मंगलदीप अगरबत्ती ब्रॅन्डचे उत्पादन घेण्यात येत आहे. या प्रकल्पातुन निर्माण होणारी अगरबत्ती खरेदी करण्याची जबाबदारी आयटीसी कंपनीने घ्यावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचयाशी चर्चा केली होती. त्या माध्यमातुन ही जबाबदारी आयटीसी कंपनीने स्विकारली असून आता पोंभुर्णा येथून निर्माण होणारा हा भक्तीचा सुगंध मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरापर्यंत पोहचला आहे. श्री गणेश चतुर्थीचे शुभऔचित्य साधुन ‘Mangaldeep Temple – Lord Ganesha’s favourite fragrances Agarbatti’ या नावाने ही अगरबत्ती श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग आणि अभिनेते सोनू सूद यांच्या उपस्थितीत ही अगरबत्ती सिध्दीविनायकाला अर्पण करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी पाचही अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्याआधी श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेवूनच सादर केले आहेत. श्री सिध्दीविनायकावरची त्यांची श्रध्दा या अगरबत्तीच्या माध्यमातुन बाप्पाच्या चरणी अर्पण होत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्पातून उत्पादीत होणारी अगरबत्ती देशासह जगभर जावी हे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे स्वप्न होते. ही अगरबत्ती श्री सिध्दीविनायकाच्या चरणी प्रथमतः अर्पण होत असल्याने आ. मुनगंटीवार यांची स्वप्नपूर्ती होत आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाच्या कार्यकाळात चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत हा प्रकल्प मंजूर केला. चंद्रपूरच्या बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन कार्यान्वीत या प्रकल्पाच्या प्रशस्त शेड वजा इमारतीत एकूण ७५ स्वयंचलित मशीनद्वारे अगरबत्ती उत्पादित केली जात आहे. तसेच बसविण्यात आलेल्या आधुनिक संयंत्राद्वारे सेटिंग, पॅकेजिंग ही पुढील प्रक्रिया पार पाडली जात आहे. दरमहा ७५ मेट्रिक टन अगरबत्तीचे उत्पादन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सुमारे २०० स्त्री तसेच पुरुषांना प्रकल्पात रोजगार उपलब्ध होत आहे. हा अगरबत्ती प्रकल्प साकारण्यासाठी मध्य चांदा वनविभागाने वनजमीन मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने योजना मंजुरी व निधी देण्यासंबंधात सहकार्य केले. त्यामुळे प्रकल्पाचे काम अल्पावधीत पूर्ण करता आले. आता हा प्रकल्प या भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचे प्रशस्त दालन ठरले आहे. या आधी व्हिएतनाम मध्ये उत्पादीत होणारी अगरबत्ती आपण वापरायचो आता पोंभुर्णा येथे उत्पादीत होणा-या अगरबत्तीच्या माध्यमातुन श्रध्दा आणि भक्तीचा खरा सुगंध दरवळेल असे आ. सुधीर मुनगंटीवार आपल्या भाषणात नेहमी म्हणतात. पोंभुर्णा सारख्या आदिवासीबहूल मागासित भागात अगरबत्ती प्रकल्पासह टूथपीक उद्योग, बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट, आदिवासी महिलांची राज्यातील पहिली कुक्कुटपालन संस्था असे रोजगार निर्मीतीचे व महिलांसाठी आत्मनिर्भरतेचे प्रकलप आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कार्यान्वीत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पोंभुर्णा येथे त्यांनी मुर्त रूप दिले आहे. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे उत्पादीत होणारी अगरबत्ती नव्या आकर्षक स्वरूपात एका प्रतिष्ठीत ब्रॅन्डच्या माध्यमातुन राजधानीतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर अर्पण होत असल्याने या एकूणच प्रक्रियेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तळमळीने काम करणा-या एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातुन उत्पादीत अगरबत्तीचा चांदा ते बांदा असा हा प्रवास म्हणूनच लक्षवेधी ठरला आहे.