चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक आवरपूर सिमेंट वर्क्स येथे खासदार बाळू धानोरकर यांनी सदिच्छा भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी अल्ट्राटेकचे उपाध्यक्ष विजय एकरे यांचेकडून या उद्योगाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. उत्पादन, पुरवठा व कामगाराच्या समस्या तसेच सामाजिक दायित्व निधी अंतर्गत करण्यात आलेली कामे व प्रस्तावित कामाबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी सामाजिक दायित्व निधीच्या वापर या भागातील जनतेच्या लोकाभिमुख कामाकरिता करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.
यावेळी भेटीत यांचेसह राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे नेते विनोद दत्तात्रेय, सोहेल शेख, तसेच अल्ट्राटेक व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या भागातील जनता मोठ्या प्रमाणात शेती करीत असते. या भागातील नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या उद्योगाने पुढे येऊन योजना आखणे गरजेचे आहे. येत्या काळात या निधीच्या वापर फक्त रस्ते बांधण्यासाठी न करता या भागातील नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता व्हावी असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
यावेळी इतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येथील प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याकरिता मी सदैव तत्पर आहे. कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.