चंद्रपूर दि.17 जुलै: डाक विभागाने स्टॅम्प डिझाईन फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. भारतातील यूनेस्को जागतिक वारसा स्थळे (सांस्कृतिक) या संकल्पनेवर ही स्पर्धा आधारित आहे. 2020 मधील स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या हेतूने आयोजित ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर 7 जुलै रोजी मायजीओव्ही पोर्टलवरून सुरू करण्यात आली आहे.नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
देशाच्या सर्व भागातील व सर्व वयोगटातील लोक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. यासाठी स्पर्धकांनी स्वत: काढलेले छायाचित्र मायजीओव्हीच्या https://www.mygov.in/task/design-stamp-themed-unesco-world-heritage-sites-india-cultural/ या पोर्टलवर द्यावीत.
या स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2020 आहे. विजेत्या छायाचित्रांचा उपयोग डाक तिकीट तयार करण्यासाठी केला जाईल. या डाक तिकीटांचे येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी लोकार्पण होईल.
निवड करण्यात आलेल्या विजेत्यांना प्रथम पुरस्काराचे रोख रुपये 50 हजार, द्वितीय पुरस्कार रोख रुपये 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि तृतीय पुरस्कार रुपये 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक विजेत्या स्पर्धकाला देण्यात येणार आहे. तर 5 प्रोत्साहनपर पुरस्कार रुपये 5 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांची नावे इंडिया पोस्ट च्या संकेतस्थळावर 15 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिद्ध केली जातील. या स्पर्धेच्या प्रवेशाची शेवटची तारीख 27 जुलै 2020 आहे.