अॅड. जयंत साळवे यांच्या मित्रा पत्रसंग्रहाचे प्रकाशन
चंद्रपूर : आधुनिक संवाद माध्यमाच्या युगात पोस्टाने पत्र पाठविण्याची संस्कृती हरविली. संवादाच्या नव्या साधनांनी आता पत्रांची जागा घेतली. मात्र, माणुसकीचे मोठे नुकसान झाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व कवी प्रभु राजगडकर यांनी केले. अॅड. जयंत साळवे यांच्या ‘मित्रा’ पत्रसंग्रहाचे प्रकाशन करताना रविवारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी लोणार सरोवर येथील कवी डॉ. विशाल इंगोले तर भाष्यकार म्हणून समीक्षक डॉ. पद्मरेखा धनकर, अभियंता भूपेश नेतनराव उपस्थित होते. ‘मित्रा’ चे लोकार्पण लेखकाची आई शालिनी साळवे आणि पत्नी अपूर्वा यांचे हस्ते झाले. प्रभु राजगडकर पुढे म्हणाले, अॅड. जयंत साळवे यांच्या कुटुंबाला परिवर्तनवादी प्रबोधनाचा दीर्घ वारसा आहे. त्यामुळे पत्र लेखनासारखी ललित साहित्य कलाकृती लिहिताना त्यांनी सामाजिक संदेशाचा विचार सोडला नाही. हा पत्रसंग्रह राजकीय व्यक्तींनी वाचला तर तेदेखील नक्कीच अंतर्मुख होतील, असेही त्यांनी नमुद केले. एका पत्राचा संदर्भ देऊन विवेचन करताना राजगडकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भूपेश नेतनराव यांनी पत्रसंग्रहाच्या बलस्थानांवर प्रकाश टाकला. अध्यक्ष डॉ. विशाल इंगोले यांनी अॅड. साळवे यांच्या पुस्तकाचे मौलिकत्व विशद करून भविष्यात पुन्हा उत्तम कलाकृती लिहितील, अशी आशा व्यक्त केली. पुस्तकातील दोन पत्रांचे वाचन नागपूरचे रंगकर्मी रमेश लखमापूरे व चंद्रपुरातील डॉ. सुचिता देशमुख यांनी केले. अॅड. साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल, राजू जवळे, डॉ. किशोर कवठे, सप्तरंग प्रकाशनाचे मनोज बोबडे, आशिष देव यांचा सत्कार करण्यात आला. संचालन कवी किशोर मुगल यांनी केले. किरण काशिनाथ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर व नागपुरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
पत्रसंग्रह माणुसकीचा ठेवा-डॉ.पद्मरेखा धनकर
अॅड. जयंत साळवे यांचा पत्रसंग्रह भावनेने ओथंबलेला व विचारांनी समृद्ध आहे. लेखक विधी क्षेत्रात कार्यरत असताना इतक्या उत्तम दर्जाचे लेखन करून मराठी साहित्यातील पत्रलेखन संस्कृतीत मोलाची भर घातली. मोबाईलबर मराठीत दोन ओळी लिहिण्याऐवजी इमोजी टाकणे म्हणजे पुन्हा आपण चिन्हांकडे जात असल्याची खंत भाष्यकार डॉ. पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केली. अॅड. साळवे यांचा पत्रसंग्रह माणुसकीचा ठेवा असल्याने सर्वांनी वाचावा, असे आवाहनही त्यांनी केले.