चंद्रपूरवासी व्याकुळ, अधिकाऱ्यांची चुप्पी

 

चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद

चंद्रपूर : पारा ४० अंश सेल्सीअसच्या जवळ पोहोचला आहे. ऊन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. शरिराची लाहीलाही होत असतानाच चंद्रपूरकरांचा घसा आता पिण्याच्या पाण्याविना कोरडा पडू लागला आहे. मागील चार दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. मात्र, याविषयी महापालिकेचे अधिकारी बोलण्यास तयार नाही. दुरुस्ती पूर्ण होवून पाणीपुरवठी कधी सुरळीत होईल, याविषयी खुद्द प्रशासनच अनभिज्ञ असल्याने चंद्रपूरकरांना पुन्हा किती दिवस पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

इरई धरणावरुन येणाऱ्या पाइप लाइन जवळ चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या पाइप लाइन दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे इरई धरणावरुन होणारा पाणीपुरवठा होवू शकला नाही.
दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे किमान दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहिल, याची नोंद घ्यावी, असा संदेश मनपा प्रशासनाच्या वतीने माध्यमावर टाकण्यात आला. त्यामुळे चंद्रपूरकरांनीही दोन दिवस इकडून-तिकडून पिण्याच्या पाण्याची जुडवाजुडव करून दिवस काढले. परंतु, दोन दिवसांचा खंडित पाणीपुरवठा चार दिवस लोटूनही पूर्वपदावर होवू शकला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेतील पदाधिकारी आपले वजन वापरून आपापल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. परंतु, शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. यासंदर्भात आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. पाणीपुरवठा विभागातील अन्य अधिकारी याविषयी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आता चंद्रपूरकरांनी पाण्यासाठी कुणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने तातडीने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शहरातील नागरिकांचा संयमाचा बांध कधीही फुटू शकतो. त्याला मनपा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल, असे संतप्त नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here