चंद्रपूर, 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या फिर्यादीनुसार एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
शहरात चोरीचे हे प्रकार नित्यनेमाने सुरुच आहे. दररोज शहरात कोणत्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारचा गुन्हा दाखल होत आहे. दररोज प्रमाणे सकाळी फिरायला पायी जात असलेल्या फिर्यादी सुनीता सुधाकरराव गंपावार (69, रा. पठाणपुरा वार्ड, चंद्रपूर) यांच्या समोरुन मुख्य मार्गावर असलेल्या बैंक ऑफ इंडिया समोर दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. या दरम्यान श्रीमती गंपावार खाली पडले व त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत देखील झाली आहे.
मागील काही महिन्यांपासून चोरांनी शहरातील विविध भागांमध्ये थैमान घातले असताना पोलिसांना मात्र चोरट्यांची ही टोळी गजाआड करण्यास अद्यापही यश आलेले नाही.