नविन पोलिस अधिक्षकांपुढे गुन्हेगारांचे आवाहन !
चंद्रपूर,1 ऑक्टोबर:चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हत्यांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नविन पोलिस अधिक्षकांनी पदभार सांभाळल्यानंतर जिल्ह्यात ६ च्या वर हत्या झाल्या आहेत, या हत्यांमुळे चंद्रपूर जिल्हा पूर्णपणे हादरला असून अपराधी प्रवृत्तीने आपले डोके वर काढले आहे, त्यांना रोखण्याचे मोठे आवाहन नविन पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचेसमोर उभे ठाकले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारी कोळसा-रेती-दारू तस्करी व तस्करांच्या पाठिशी असणारे राजकीय वलय, व या अपराधिक प्रवृत्तींची हाथ मिळवणी करणारे पोलिस विभागातील “शुक्राचार्य” यांच्यावर नियंत्रण आणण्यासंबंधात नविन पोलिस अधिक्षकांना आखणी करावी लागणार आहे. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रिदाचा चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांना विसर पडला आहे, असे दुःखाने म्हणावे लागते. जिल्ह्यामध्ये ज्या अपराधी प्रवृत्तींनी छत्रपती चिडे सारख्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला वाहनाखाली चिरडून मारले, अशाचं गैरप्रवृत्तीशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिस विभागातील बेईमान पोलिसांना शोधुन त्यांचेवर कारवाई करण्याचे धाडस पोलिस अधिक्षकांना करावे लागणार आहे. जिल्ह्यामध्ये वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण, त्यास कारणीभूत असलेली व्यवस्था याचा तपास व निर्भिडपणे कडक निर्णय घेण्यासंबंधात पाऊले उचलणे आज गरजेचे आहे. नविन पोलिस अधिक्षकांकडून जिल्ह्यातील नागरिकांना फार मोठी अपेक्षा नाही. कारण जिल्ह्यातील अपराधी प्रवत्तीचे पाळे-मुळे हे त्यांच्याच विभागातील नायकांसोबत जुळले असल्यामुळे ही मुळे उखडून फेकण्यात पोलिस अधिक्षक यशस्वी होतील काय?ही संशयाची बाब आहे. मागील काही वर्षापासून जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या अपराधिक घटना व त्यांचे सुत्रधार हे नेहमी पोलिसांच्या तावडीतून बाहेर राहिले आहे. ‘मोहऱ्यांवर’ कारवाई करण्यातचं जिल्हा पोलिस विभागाने ‘धन्यता’ मानली आहे. मुळ सुत्रधारांनी मात्र राजकीय वलयाचा ‘भास’ निर्माण करून आपले गैरप्रकार सुरू ठेवले, त्यामुळे जिल्ह्यात ‘कायदा व सुव्यवस्था’ बिघडली. नुकतेच जिल्ह्यात झालेल्या ‘हत्या’ याचा पुरावा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नविन पोलिस अधिक्षकांनी या गंभीर बाबींवर लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्हा पंजाबसारखा ‘उडता चंद्रपूर’ संबोधल्या गेल्यास आश्चर्य वाटणार नाही.