चंद्रपूर, दि. 17 जुलै: स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तम नियोजन असेल तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच प्राविण्य प्राप्त होते. असे प्रतिपादन सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत यांनी केले. 16 जुलै रोजी स्पर्धा परीक्षा वेबीनारद्वारे युवक-युवतींना मार्गदर्शनात ते बोलत होते. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राअंतर्गत 15 जुलै 17 जुलै दरम्यान स्पर्धा परीक्षा व रोजगार विषयक मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत यांनी युवक-युवतींना मार्गदर्शनात नियोजन, सातत्य, जिद्द, चिकाटी या बाबी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षे बरोबर इतरही पर्यायी योजना तयार असावी असे त्यांनी यावेळी सांगितले. वाचन करीत असताना कोणत्या प्रकारचे वाचन करावे याविषयीचे ज्ञान सुद्धा असणे गरजेचे आहे.
यावेळी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. या मार्गदर्शन वेबीनारमध्ये जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आजच्या युगामध्ये इंटरनेट झालेला आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती एका क्लिकवर तात्काळ मिळते. स्पर्धापरीक्षेची तयारी करीत असताना स्वतः प्रश्न तयार करून या प्रश्नाची उत्तरे शोधून अभ्यास करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे भविष्याचा वेध घेऊन ध्येय निश्चित असावे. असे युवक-युवतींना मार्गदर्शनात सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.