सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

चंद्रपूर: भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते, राज्‍याचे माजी अर्थमंत्री तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्‍हयाचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज कॅबिनेट मंत्री म्‍हणून शपथ घेतली. राजभवन मुंबई येथे पार पडलेल्‍या शपथविधी सोहळयात सुधीर मुनगंटीवार यांना राज्‍यपाल भगतसिंह कोशारी यांनी मंत्री पदाची शपथ दिली.

२०१४ ते २०१९ या भाजपा शिवसेना युती सरकारच्‍या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ व वनमंत्री पदाची जवाबदारी सांभाळली होती. उच्‍च विद्याविभुषीत लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले सुधीर मुनगंटीवार १९९९ मध्‍ये काही महिने मंडळातमाजी मुख्‍यमंत्री नारायण राणे यांच्‍या मंत्री मंडळात पर्यटन व ग्राहक संरक्षण मंत्री म्‍हणून कार्यरत होते. १९७९ मध्‍ये चंद्रपूरच्‍या सरदार पटेल महाविद्यालयाच्‍या छात्र संघाच्‍या सचिव पदावर निवड झाल्‍यापासून आजतागायत भारतीय जनता पार्टीमध्‍ये विविध संघटनात्‍मक पदांवर त्‍यांनी कार्य केले आहे. प्रामुख्‍याने १९९३ मध्‍ये भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्‍ट्र उपाध्‍यक्ष पद, १९९६ मध्‍ये महाराष्‍ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस, २०१० मध्‍ये प्रदेश भाजपाचे अध्‍यक्ष पद देखिल त्‍यांनी भुषविले. सध्‍या भाजपाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारीणीचे ते सदस्‍य आहे.

१९९५ मध्‍ये प्रथमतः महाराष्‍ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्‍यांनी ६ टर्म विधानसभा सदस्‍य म्‍हणून प्रतिनिधीत्‍व केले आहे. महाराष्‍ट्र विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख म्‍हणून गेली अडीच वर्षे त्‍यांनी कार्यभार सांभाळला. राज्‍याचे अर्थ व वनमंत्री म्‍हणून अनेक महत्‍वपूर्ण निर्णय त्‍यांनी घेतले. वनमंत्री म्‍हणून राज्‍यात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड त्‍यांच्‍या नेतृत्‍वात करण्‍यात आली. या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुका ऑफ रेकॉर्डमध्‍ये करण्‍यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यांच्‍या मन की बात या कार्यक्रमात या वृक्ष लागवड मोहीमेचे कौतुक देखिल केले. अर्थमंत्री म्‍हणून राज्‍याच्‍या आर्थिक प्रगतीसाठी अनेक महत्‍वपूर्ण निर्णय त्‍यांनी घेतले.

सुधीर मुनगंटीवार यांना त्‍यांच्‍या कारकिर्दीत अनेक महत्‍वाच्‍या पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले आहे. १९९९ मध्‍ये राष्‍ट्रकुल संसदिय मंडळाच्‍या वतीने विधानसभेतील उत्‍कृष्‍ट आमदार, २००८ मध्‍ये अंध कल्‍याणाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनिय काम केल्‍याबददल राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघाच्‍या वतीने जी.एल. नर्डेकर स्‍मृती पुरस्‍कार, वृक्षारोपण मोहीमे संदर्भात किर्लोस्‍कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्‍थेचा कर्मवीर मासा कन्‍नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टूडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्‍ट फायनान्‍स मिनिस्‍टर पुरस्‍कार, आफ्टरनुन व्‍हॉइस या संस्‍थेद्वारे बेस्‍ट परफॉर्मिंग मिनिस्‍टर पुरस्‍कार, जे.सी.आय. महारष्‍ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्‍कार, फेम इंडिया तर्फे उत्‍कृष्‍ट मंत्री पुरस्‍कार अशा प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले.

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन संसदीय संघर्ष करत लोकहीताचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले. यात प्रमुख्‍याने नागपूर विद्यापीठाला वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव तर अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्‍हयांसाठी गोंडवाना विद्यापीठ, पुणे विद्यापीठाला ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांचे नाव, क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घेणे व पुण्‍यातील भिडे वाडयात क्रांतीज्‍योतीचे स्‍मारक उभारण्‍याचा निर्णय असे विविध विषय त्‍यांनी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन मार्गी लावले. विधानसभेत सर्वाधीत अशासकीय विधयेके मांडण्‍याचा विक्रम त्‍यांच्‍या नावावर आहे. त्‍यांच्‍या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात मंत्री कार्यालय आयएसओ करण्‍यात आले. हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला.

सुधीर मुनगंटीवार यांना पुन्‍हा कॅबिनेट मंत्री पदी नियुक्‍ती देण्‍यात आल्‍याने प्रामुख्‍याने चंद्रपूर जिल्‍हयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन, विकासाचा झंझावात पुन्‍हा एकदा सुरु होणार असल्‍याची आनंददायी चर्चा नागरिकांमध्‍ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here