चंद्रपूर, दि. 14 जुलै : संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काही भागाला प्रत्यक्ष भेट देवून पूरग्रस्तांशी संवाद साधला.
जिल्हाधिका-यांनी सुरुवातीला सिस्टर कॉलनी, उमाटे ले-आउट येथील नागरी वस्त्यांमध्ये जमा झालेल्या पूराच्या पाण्याची पाहणी केली. त्यानंतर आंबेकर ले-आउट (घोटकाळा) येथे पूरग्रस्तांना स्थलांतरीत केलेल्या ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेला भेट देवून येथे असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. पिण्याचे शुद्ध पाणी आणि जेवण वेळेवर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकानिहाय आढावा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टिचा फटका अनेक तालुक्यांना बसला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यात तालुक्याची पूर परिस्थिती, जीवित-वित्त हाणी, किती भागात पाणी शिरले, घरांचे झालेले नुकसान, अंशत: व पूर्ण पडझड झालेल्या घरांची संख्या, जनवरांचे झालेले नुकसान, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांची संख्या आदिंचा आढावा घेतला.
बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार नीलेश गौंड आदी उपस्थित होते.