पाणी टंचाई विरोधात चंद्रपूर शहर काँग्रेसचे “घागर फोडो” आंदोलन
चंद्रपूर : शहरातील पारा ४० अंश सेल्सीअसच्या जवळ पोहोचला आहे. उकाळ्यामुळे जनता आधीच त्रस्त आहे. अशात मागील पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु, या गंभीर समस्येकडे मनपातील सत्ताधारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यासर्व प्रकाराला मनपाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. उद्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी, २८ मार्चला दुपारी २ वाजता शहरातील मागील पाच दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर घागर फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री. तिवारी बोलत होते. आंदोलनादरम्यान, माजी महापौर संगीताताई अमृतकर, अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, प्रीतीताई शहा यांनीसुद्धा महापालिकेच्या भोंगळ कारभारावर चांगलाच संपात व्यक्त केला. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.
इरई धरणातील पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. पाइप लिकेजमुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पाच दिवस लोटूनही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच घागर फोडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अड्डुर, चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, नगरसेवक सकिनाताई अन्सारी, नगरसेवक संगीता भोयर, नगरसेवक वीणाताई खणके, नगरसेवक अमजद अली, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक बापू अन्सारी, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप सिडाम, अनुसूचित जाती महिला विभागाच्या शहराध्यक्ष शालिनी भगत, अनुताई दहेगावकर, स्वाती त्रिवेदी, राजवीर यादव, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, राजेश त्रिवेदी, मनोज खांडेकर, काशीफ अली, मोनू रामटेके, केतन दुर्सेलवार, अशोक जंगम, राहुल चौधरी, सागर खोब्रागडे, भालचंद्र दानव, साबिर सिद्दीकी, अल्ताफ मामू, रोहित साव, हर्षा चांदेकर, वाणी दारला, सारिका ठोंबरे, रुपाली वाटेकर, सौरभ ठोंबरे, राजेश वर्मा, पूजा आहुजा, गुंजन येरमे, नागेश बंडेवार, अशपाक हुसेन, मोहन डोंगरे, आशुतोष वानखेडे, सविता मांडवकर, हारून भाई, नेहा मिश्रा, रसिका वाघाडे, अशोक गड्डमवार, नितीन मंजिरे, लखन पराते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अधिकारी, पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती, शिपायाला निवेदन
शहराचा पाणीपुरवठा मागील पाच दिवसांपासून खंडित आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत. परंतु, मनपातील अधिकारी, पदाधिकारी आपल्याच धुंदीत आहेत. आंदोलनानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले. परंतु, महापालिकेत अधिकारी, पदाधिकारी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे शिष्टमंडळाने शिपाई नाना लांडे यांना मागणीचे निवेदन सादर केले.