रामदेवबाबा ट्रांसपोर्ट कंपनीचे संचालक धर्मेंद्र तिवारी यांची माहिती
चंद्रपूर: रामदेवबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून मागील ५० वर्षांपासून कोळसा व्यवसाय केला जात आहे. त्यासोबतच तिवारी कुटुंबीय सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. त्यामुळे नरेश पुगलिया यांनी तिवारी कुटुंबियांची बदनामी करण्याच्या हेतुने रामदेवबाबा ट्रान्स्पोर्ट कंपनीवर आरोप केले असल्याची माहिती कंपनीचे संचालक धर्मेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रामदेवबाबा ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मालकाकडे स्लॅक कोलचा डिओ असताना त्याचे तीन ट्रक कोळसा भरून जात होता. नांदगावातील काही युवकांनी हे तीन्ही ट्रक पकडून याची पोलिसांना माहिती दिली. मात्र, याची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. हे प्रकरण दडपण्यात आले, असे आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. कोळसा व्यवसायातील मागील ५० वर्षांत कंपनीवर एकही आरोप नाहीत. हे सर्व आरोप केवळ बदनामी करण्यासाठी करण्यात आले आहेत.
रामदेवबाबा ट्रान्स्पोर्ट कंपनीचे ट्रक जंगम नामक आपल्या कार्यकर्त्याला पाठवून अडविण्यात आले. त्यानंतर वेकोलिचे अधिकारी, पोलिस अधिकारी घटनास्थळी आले. जर कोळसा अवैधरित्या असता तर अधिकाऱ्यांनीच कारवाई केली असती. मात्र, कोळसा हा वैध मार्गाने नेला जात होता. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
पुगलिया यांनी तिवारी कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशातून रामदेवबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीवर आरोप केले आहेत. त्यामुळे पुगलिया यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्यात येणार असल्याचेही तिवारी यांनी यावेळी सांगितले.