चंद्रपुरातील १३ सायकलपटुंनी केली कौतुकास्पद कामगिरी
चंद्रपूर : मागील काही दिवसांत सायकलिंगचे फॅड वाढले आहे. त्यामुळे सकाळी, सायंकाळी सायकली रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी मित्रांचा गोतावळा दूर अंतरावर जाताना बघायला मिळत आहे. मात्र, तब्बल ४०० किमोमीटरचे अंतर सायकलिंग केल्याची बाब अनेकांना आश्चर्य वाटणारी आहे. परंतु, ही कामगिरी चंद्रपुरातील १३ सायकलपटुंनी केली आहे. निमित्त होते ऑडेक्स पॅरिस संस्थेअंतर्गत नागपूर रॉयदेनिअरिंग यांनी आयोजित केलेल्या ४०० किलोमीटर ब्रेव्हे स्पर्धेचे.
लांब पल्ल्याच्या सायकलिंगकरिता ऑडेक्स पॅरिस संस्थेअंतर्गत नागपूर रॉयदेनिअरिंग यांनी आयोजित केलेल्या ४०० किलोमीटर ब्रेव्हे स्पर्धेचे आयोजन १५ जानेवारीला करण्यात आले होते. पहिल्यांदा आयोजित या उपक्रमात चंद्रपुरातील कुलदीप (गोलू) कपूर, अनिल टहलियानी, शाकीर उकानी, डॉ. आशीष गजबे, विकास भट, मोहम्मद कांचवाला, सुनील जुनघरे, अली उकानी, इरफान रय्यानी, बंटी बोधवानी, सुमित घाटे, पीयूष कोटकर, अब्दुल आबिद कुरेशी यांनी सहभाग घेत तब्बल ४०५ किलोमीटर सायकल चालविली.
नागपूर, यवतमाळ,आर्णी आणि या मार्गे जाऊन परत येणे अशी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत नागपूर, भोपाळ, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, जळगाव, जबलपूर येथील १८ ते ६२ वयोगटातील ३९ सायकलपटू सहभागी झाले होते.