चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात असलेल्या 869 ॲक्टीव्ह रुग्णांपैकी 820 नागरिकांना अतिशय सौम्य लक्षणे असून ते सर्व गृहविलगीकरणात आहेत. हा लसीकरणाचा परिणाम आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरने कोव्हीड नियंत्रणासाठी अतिशय चांगले काम केले आहे. मात्र कालावधी होऊनही दुसरा डोज घेणा-यांची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घेतले तर जिल्ह्यात तिसरी लाट थोपविण्यास मोलाची मदत होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव अनुपकुमार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात तिस-या लाटेची पुर्वतयारी, लसीकरण व इतर विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.
लसीकरणाचे दोन्ही डोज घेतलेल्या नागरिकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता अतिशय कमी आहे, असे सांगून श्री. अनुपकुमार म्हणाले, लक्षणे असलीच तर ती अतिशय सौम्य प्रमाणात राहील. त्यामुळे संबंधित व्यक्तिला रुग्णालयात बेड किंवा ऑक्सीजनची गरज पडणार नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह 869 पैकी 820 जण सौम्य लक्षणे असल्यामुळे गृह विलगीकरणात आहे. तर 31 जण सीसीसी आणि 18 जण डीसीएच मध्ये दाखल आहेत. नवीन व्हेरीअंटमुळे रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. जिल्ह्यात सध्याच आरोग्य यंत्रणेवर ताण नाही. तरीसुध्दा आपली पूर्ण तयारी ठेवावी.
समोरचा एक ते दीड महिना महत्वाचा आहे, असे सांगून पालकसचिव म्हणाले, कोरोनाच्या दोन अनुभवांमुळे जिल्हा प्रशासनाने तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर चांगले नियोजन केले आहे. आणखी अलर्ट राहून काम करा. ज्यांनी पहिला डोज घेतला आहे, मात्र कालावधी होऊनही दुसरा डोज घेतला नाही, अशा नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून लसीकरण करा. फ्रंट लाईन वर्कर आणि हेल्थ केअर वर्करला दोन्ही डोज अनिवार्य करा. जिल्ह्यात अद्यापही अडीच लाखांच्या आसपास नागरिकांनी दुसरा डोज घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. या महिन्या अखेरपर्यंत त्यांचे लसीकरण करून घ्या. तसेच लसीकरणाबाबत समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहचून जाणीवजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत माहिती देतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना, 90 मेट्रीक टन ऑक्सीजनचे नियोजन, जंबो सिलींडर, नमुन्यांची तपासणी आदी बाबींबाबत पालकसचिव यांना अवगत केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, दुस-या लाटेत जिल्ह्यात 16882 ही सर्वोच्च ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या होती. त्याच्या दीडपट जास्त म्हणजे यावेळेस प्रशासनाने 25323 रुग्णांचे नियोजन केले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोज घेणा-यांची संख्या 15 लक्ष 37 हजार 314 असून (93.60 टक्के) दुसरा डोज घेणा-यांची संख्या 10 लक्ष 79 हजार 356 (65.74 टक्के) असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.
यावेळी पालकसचिवांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, धान खरेदी आदी विषयांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गर्गेलवार आदी उपस्थित होते.