मुख्य रस्ते, गोल बाजार, गंज मार्केट रात्रीच स्वच्छ करा 

मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांचे स्वच्छता निरीक्षकांना निर्देश

चंद्रपूर, ता. ७ : शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ली आणि बाजारपेठेसह मुख्य मार्गावरील रस्ते वेळच्या वेळी स्वच्छ करण्यात यावेत. गांधी चौक ते जटपुरा गेट, गोल बाजार, गंज मार्केटमध्ये रात्रीच्या वेळीच स्वच्छता करून सदर कचरा रात्रीच उचलण्यात यावा, अश्या सूचना मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांना दिल्या.

महापौर राखी कंचर्लावार यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या दृष्टीने तसेच कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेवर भर देण्यात येत आहेत. दरम्यान यासंदर्भात मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांच्यासह शहरातील सर्व झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. यावेळी आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले की, शहरातील रस्त्याची साफसफाई करताना जमा झालेला कचरा वेळीच उचलण्यात यावा. नालीत कचरा टाकताना कोणी आढळल्यास कारवाई केली जाईल. शहरातील नागरिकांनी देखील कचरा जाळू नये तसेच रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा न टाकता घंटागाडीतच टाकावा, असे निर्देश दिले. जे नागरिक घंटागाडीत कचरा टाकणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. सफाई अभियान राबवून गांधी चौक ते जटपुरा गेट, गोल बाजार शिवाय गंज मार्केटमध्ये रात्रीच्या वेळीच स्वच्छता करून सदर कचरा रात्रीच उचलण्यात यावा, अश्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here