राज्यात मोटार वाहन सुधारणा अधिनियम लागू
चंद्रपूर : मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ राज्यभरात लागू करण्यात आला आहे. यामुळे दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना सुधारित नियमानुसार दंड भरावा लागणार आहे. तसेच अनेक प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खटलासुद्धा दाखल करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. परवाना नसताना वाहन चालविणे अल्पवयीन मुले वाहन चालविणे, परवाना नसलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास देणे यासाठी आधी केवळ ५०० रुपये दंड होता. मात्र, आता ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
हेल्मेट न घालता वाहन चालविल्यास यापूर्वी केवळ ५०० रुपये, तर ट्रिपल सीटचा वापर केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावला जात होता. मात्र, केंद्र सरकारने २०१९ मध्ये या कायद्यात सुधारणा केली. आता महाराष्ट्र शासनाने हा कायदा राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड, ट्रिपल सीट असल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यासोबतच या दोन्हीमध्ये तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे यासाठी आधी २०० रुपये दंड होता. आता हा दंड ५०० रुपये करण्यात आला असून दुसऱ्यांदा आढळल्यास १५०० रुपये वसूल करण्यात येणार आहे. रांग साइड वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड आणि न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. कर्कश हार्न वाजविण्यावर आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यानंतर पुन्हा आढळल्यास २ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याआधी यासाठी २०० रुपये दंड होता. वेग मर्यादेचे उल्लंघन चारचाकी वाहने, जड वाहने यासाठी आधी एक हजार रुपये दंड होता. आता चारचाकी वाहने २ हजार, तर जड वाहनांसाठी चार हजार रुपये दंड आहे. विना इन्शुरन्स वाहन चालविताना आढळल्यास २ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. पुन्हा याच कायद्याचे उल्लंघन केल्यास ४ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
फॅन्सी नंबर प्लेटसाठी आधीसारखाच एक हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे. धोकादायकरित्या वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड आणि न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. नोपार्किंग, राँग पार्किंगमध्ये वाहन आढळल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासोबतच इतर सर्वसाधारण अपराधासाठी दोनशे, पाचशे ते हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ट्रान्स्पोर्ट वाहनावर प्रेस, पोलिस, अॅडव्होकेट, पायलट असे लिहिणे चुकीचे आहे. मोटार वाहन कायद्यात त्यावर दंडाची तरतूद केली आहे. यापूर्वी केवळ दोनशे रुपये वसूल केला जात होता. मात्र, आता नवीन कायद्यानुसार ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून, वारंवार असा प्रकार करताना आढळून आल्यास १५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे चंद्रपूर-नागपूर मार्गावर दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, अनेकजण वाहने चालविताना हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत अपघातातील मृत्यू झालेले हे सर्वाधिक हेल्मेट घातलेले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे वाहने चालविताना हेल्मेटचा वापर करावा. मद्यप्राशन करून वाहने चालवू नये. तसेच पायदळ जाणाऱ्या नागरिकांनी डाव्या नाही, तर उजव्या साईडचा वापर करावा, असे आवाहन चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.