मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा आणि मॉल सुरू झाले आहे. पण, मंदिरं कधी उघडणार याकडे सर्वंचं लक्ष लागलं होतं. अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल’ असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.