चंद्रपूर ६ जानेवारी – सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारणे गरजेचे आहे. या पंचतत्वावर आधारित “माझी वसुंधरा” अभियान हे राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत असून चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत चंद्रपूर शहरात हे अभियान राबविण्यात येत असून मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मा. आयुक्त राजेश मोहिते यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत बोलतांना आयुक्त यांनी राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानात मनपाचे विविध विभाग कश्या प्रकारे सहयोग देत आहेत याचा आढावा घेतला. मनपातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून पुढील काळात विविध स्पर्धा , सायक्लोथॉन, स्वच्छता ड्राईव्ह असे नवनवीन उपक्रम घेतले जाणार आहेत.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत १५०० गुण आहेत. त्यामध्ये पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे.
जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन, तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन. विद्युत वाहनाकरिता चार्जिंग पाइंट निर्माण करणे. आकाश तत्त्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरुपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे. शहरातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून प्रत्येक बाबीवर गुणांकन केले जाणार असून त्या पद्धतीने सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.
याप्रसंगी पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली.बैठकीस सहायक आयुक्त विद्या पाटील, श्री हजारे, श्री. आशिष मोरे, सर्व विभागप्रमुख तसेच स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.