धानोरकर दाम्पत्यांनी तृतीयपंथींचे शुभ आशीर्वाद घेत साजरी केली दिवाळी

चंद्रपूर/ प्रतिनिधी
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करीत साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. पण, आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी चक्क तृतीयपंथींचे शुभ आशीर्वाद घेत या समुदायासोबत दिवाळी साजरी केली.
यंदा कोरोनाचे भीषण संकट आहे. लॉकडाऊनमुळे असंघटित आणि अल्पसंख्याक असलेला तृतीयपंथी  वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत दिवाळी सणाचे आनंद द्विगुणीत करण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी तृतीयपंथी समुदायाला घरी निमंत्रित केले होते. आपल्याला निखळ आनंद देणारी दिवाळी साजरी करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी या समुदायाच्या चेह-यावर स्नेह, प्रेम आणि आनंद झळकत होता.
यावेळी धानोरकर दाम्पत्याने तृतीयपंथी लोकांची आस्थेने विचारपूस करीत संवाद साधला. त्यांच्या समस्या, समाजाकडून अपेक्षा काय आहेत हे ही जाणून घेतले. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण राष्ट्रीय पातळीवर हा आवाज उचलणार असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. विशेष म्हणजे बाळू धानोरकर हे लोकसभेला उभे असताना त्यांच्या प्रचाराची धुरा तृतीयपंथी लोकांनी सांभाळली होती. तेव्हापासूनच धानोरकर या समाजाशी सातत्याने जुळून आहेत. याचित फलश्रुती म्हणून त्यांनी दिवाळीला तृतीयपंथी लोकांना बोलावून ते देखील आपल्या कुटुंबाचा भाग आहे असा संदेश दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here