चंद्रपूर दि.16 सप्टेंबर: कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते काल (दि.15 सप्टेंबर) करण्यात आला. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये संशयित व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे यामध्ये अति जोखमीची व्यक्ती जसे, की उच्च रक्तदाब, मधुमेह, फुप्फूसाचे अथवा हृदयाचे आजार असलेले व्यक्ती, गरोदर महिला इत्यादींना उपचार देणे. कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे. तसेच सारी किंवा आयएलआय रुग्णाचे गृह भेटीद्वारे सर्वेक्षण करणे, कोविड-19 तपासणी व उपचार करणे तसेच गृह भेटीद्वारे प्रत्येक नागरिकांना कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
ही मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यात तीन सदस्यीय पथकाद्वारे कार्य सुरु आहे. यामध्ये एक आशा सेविका व लोकप्रतिनिधी मार्फत दिलेले दोन स्वयंसेवक या दोन सदस्यांपैकी एक सदस्य पुरुष, एक सदस्य महिला असे एकूण तीन सदस्य असणार आहे.
या मोहिमेचा कालावधी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत असणार आहे. या कालावधीत मोहिमेच्या दोन फेऱ्या होणार असून पहिली फेरी 15 दिवसाची तर दुसरी फेरी 10 दिवसाची असणार आहे.
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी वैयक्तिक, कौटुंबिक व सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत परिणामकारक अशी त्रिसूत्री चा वापर होणार आहे. त्यापैकी नागरिकांनी किमान दोन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे. मास्कचा कटाक्षाने नियमित व योग्य वापर करणे. वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच त्यांनी सॅनीटायजरचा योग्यरीत्या वापर करणे हे प्रत्येकाने पाळले पाहिजे.
असे असणार पथकाचे कार्य:
तीन सदस्यीय पथकामध्ये एका दिवसाला 50 घरांना भेट देणार आहे.माझे कुटुंब, माझी जबाबदारी या ॲपच्या माध्यमातून व्यक्तीची कौटुंबिक माहिती भरण्यात येणार. कुटुंब सदस्यांची पल्स ऑक्सीमीटरद्वारे प्राणवायूची मात्रा तपासण्यात येईल. थर्मल स्क्रीनिंग द्वारे शरीराचे तापमान मोजण्यात येणार आहे.एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.7 म्हणजे 37 सेल्सियस पेक्षा जास्त असल्यास अथवा एखाद्या व्यक्तीची प्राणवायूची पातळी 95 पेक्षा कमी असल्यास त्या व्यक्तींना त्वरित फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करीता पाठविण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेत कार्य करणाऱ्या आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना जेवण व प्रवासासाठी 150 रुपये दैनंदिन भत्ता तर कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना 100 रुपये भत्ता देण्यात येणार आहे.