चंद्रपूर,दि.17 जुलै: जिल्ह्यात सातत्याने कोविड 19 चे रुग्ण वाढत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कित्येक महिने किंवा वर्षे राहण्याची शक्यता असून कोरोना विरुध्दची लढाई दिर्घकाळ लढावयाची आहे. अद्याप यावर लस उपलब्ध झालेली नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःची रोगप्रतीकारक शक्ती वाढविणे हाच उत्तम उपाय आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुष काढ्याचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांमधील रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हाच उपाय आहे. यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार व आयुष विभाग महाराष्ट्र शासनाने आयुष चिकित्सा पद्धतीचे उपाय सुचविले आहेत.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली डिस्ट्रीक्ट टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, सदस्य सचिव जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन राऊत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकूमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, आयुर्वेद व्यासपीठ डॉ.राजीव धानोरकर, अध्यक्ष निमा डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे, प्राचार्य आयुर्वेदिक महाविदयालय वांढरीचे डॉ.उमेश माद्यासवार, प्राचार्य होमीओपॅथी कॉलेजचे डॉ.गौरकार, जेष्ठ होमीओपॅथी तज्ञ हे सदस्य आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या पुढाकाराने आयुष उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली.
या समीतीच्या निर्णयानुसार आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॅथी औषधाचे वाटप जिल्ह्यातील सर्व गावांत प्रत्यक्ष कार्य करणारे फ्रन्ट लाईन वर्कर्स तसेच जिल्ह्यातील सर्व कॉरेन्टाईन संस्थेत विलगीकरण करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आदि कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सुद्धा वितरीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आयुष काढा वितरणाची कार्यवाही सुध्दा करण्यात येत आहे. श्रीमती विमलादेवी आयुर्वेद महाविदयालय, वांढरी येथील रस शाळेत आयुष काढा चुर्ण तयार करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व फ्रन्ट लाईन वर्कर्स यांना वितरीत करण्यात आले आहे. तसेच संस्थामध्ये विलगीकरण केलेल्या व्यक्तींना दररोज सकाळ, सायंकाळ तयार आयुष काढा देण्यात येत आहे.
असा करावा आयुष काढा तयार:
आयुर्वेद चिकित्सा पध्दतीनुसार घरीच किंवा परिसरात उपलब्ध द्रव्यांचा वापर करुन आयुष काढा तयार करता येतो. एका व्यक्तीकरीता तुळशीची पाने चार भाग, चार भाग म्हणजे 7-8 पाने, सुंठ दोन भाग, म्हणजे 1/2-1 इंच तुकडा, काळी मीरी एक भाग म्हणजे 2-3 मीरे यांचे भरड 100 मीली. पाण्यात चहा सारखे उकळवावे, चवीकरीता गुळ घालावा व गाळून प्यावे. या काढ्यात लिंबाच्या रसाचे थेंब, अर्धा चमचा हळद, कलमी (दालचिनी) 1 इंच तुकडा टाकल्यास फायदेशीर आहे. परिसरात गुळवेल उपलब्ध असल्यास तीचे खोडाचा बोटभर लांबीचा तुकडा कांडून काढ्यात टाकल्यास उत्तम असणार आहे.